Sunday, October 1, 2017

एक भन्नाट उनाड दिवस !!!


काही दिवसांपासून ट्विटर वरील मंडळींना भेटूया असा विषय सुरु होता आणि आजची तारीख ठरली. त्याचबरोबर त्याच ठिकाणी रावा ऑफिशिअल ची सुद्धा साधारण त्याच वेळी भेट ठरली होती. एका अर्थी हे चांगले होते कारण त्या मुळे दोन्ही कडे हजर राहणे शक्य झाले. आणखी एक विशेष म्हणजे शाळेतल्या मंडळींनी सुद्धा भेटी साठी आजचाच दिवस निवडला होता. म्हणजे पूर्ण तारांबळ होणार होती. पण शक्यतो मी सगळे जमवायचा प्रयत्न करतो आणि तसा तो आजही केला आणि एक भन्नाट उनाड दिवस अनुभवला. 


काल रात्री राहुल ने विचारले की सकाळी ट्विटप च्या आधी 'गेट वे' ला येणार का, तसाही काही प्लॅन नव्हता मी म्हटलं येतो, आणि सकाळी साधारण ८. ४५ ला पोचलो आणि तिकडून खरा तर भन्नाट दिवस सुरु झाला. राहुल ला ओळखत होतो, पण गोल्या, मन्या, चेतन आणि सुशील  ह्यांना भेटलो. थोडे फोटो काढले, मोंडेगर कॅफे मध्ये चहा प्यायचा सुद्धा योग नव्हता, मग परत CST ला येऊनच मस्त पोहे, वडा पाव आणि ऑम्लेट पाव खाल्ला आणि ट्विटप साठी दादर ला आलो. 

चक्क ११ च्या दिलेल्या वेळेत बरेच जण आले होते. मग ओळखी झाल्या, प्रत्येकाने आपल्याविषयी थोडक्यात सांगितले, ट्विटर वर मराठी साठी इतके जण काम करत आहेत ह्याची जाणीव झाली आणि मी स्वतः त्या उपक्रमात फारसा सहभागी नाही हे हि जाणवले. तरीही मी ट्विटर वर असल्यापासून ज्या ओळखी झाल्या त्या सगळ्यांना भेटून त्यांच्या बरोबर फोटो सेशन झाले :). ट्विटप मध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आभार, सगळ्यांशीच ओळख करून घेता आली नाही, आता त्यासाठी पुन्हा नक्की भेटू.   

रावा ऑफिशिअल च्या मीटिंग मध्ये सुद्धा सहभाही होता आले. तसा तर हा वर्षातला पहिला उपक्रम असतो, नेहमी प्रमाणेच मजा आली, फोटो इकडेही झाले. मग पुढे ठरल्या प्रमाणे जेवायला निघालो पण एकंदरीत जमलेले लोक आणि जेवायची वेळ ह्या ताल-मेळ बघता आम्ही दुधाची तहान ताकावर भागवत बर्गर खाल्ला आणि तिकडून निघालो. 

आता शाळेतल्या मंडळींना भेटायची वेळ एक तास पुढे गेली होती, जी मला नंतर कळली, पण तो हि वेळ जुन्या एक मित्र बरोबर चहा आणि गप्पात निघून गेला आणि मग आम्ही शाळेतले मित्र-मैत्रीणी भेटलो. बोलण्याच्या ओघात ३ तास कसे गेले कळले पण नाही. तरी काही जणांना आयत्या वेळी अडचणी आल्या मुळे ते येऊ नाही शकले, नाहीतर आणखी मजा आली असती. 

असा एकूण सकाळी ७ पासून सुरु झालेला उनाड दिवस रात्री ९ ला घरी येऊन संपला आणि मन एकदम प्रसन्न आणि ताजेतवाने करून गेला.